अनिश्चिततेच्या जगात भारत प्रगतीचे अद्भूत उदाहरण : मुर्मू   

नवी दिल्ली : आजचे जग अनिश्चिततेने भरलेले आहे. मात्र, त्यामध्ये भारत हे प्रगतीचे एक उद्भूत उदाहरण आहे. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून, युरोपमधील धोरणात्मक व्यापार आणि गुंतवणुकीसाठी   भारत संधी उपलब्ध करून देत आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले. 
 
स्लोव्हाकिया दौर्‍यादरम्यान परराष्ट्र मंत्रालयाने आयोजित केलेल्या स्लोव्हाकिया-इंडिया बिझनेस फोरमला मुर्मू यांनी संबोधित केले. त्या म्हणाल्या,   स्लोव्हाकिया आपल्या कामगारांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी परदेशातील मेहनती कुशल कामगार आणि व्यावसायिकांच्या शोधात आहे. मला विश्वास आहे की, भारतीय प्रतिभा स्लोव्हाकियाच्या आर्थिक प्रगतीत एक मौल्यवान भागीदार ठरू शकते. येत्या काही वर्षांत भारत ५ हजार अब्ज अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा आहे आणि आम्ही स्लोव्हाकियासारख्या आमच्या मित्र देशांसोबत भागीदारी करून हे करू अशी आशा आहे.
 
गेल्या १० वर्षांत दोन्ही देशांनी विविध क्षेत्रात सहकार्य केले आहे. युरोपियन युनियनचे प्रमुख सदस्य तसेच संरक्षण आणि उच्च तंत्रज्ञान उद्योगांचे केंद्र म्हणून स्लोव्हाकियाला भारताच्या मोठ्या ग्राहक बाजारपेठेचा, कुशल कामगारांचा आणि  स्टार्टअप इकोसिस्टमचा फायदा झाला आहे. टाटा मोटर्सची उपकंपनी असलेल्या जॅग्वार लँड रोव्हरने निट्रासह स्लोव्हाकियामध्ये महत्त्वपूर्ण गुंतवणूक केल्यामुळे ऑटोमोटिव्ह क्षेत्र विशेषतः दोन देशांमधील मजबूत दुवा म्हणून उदयास आले आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.विद्युतीकरण हा आमच्या नवीन धोरणाचा भाग आहे. आम्ही या दशकाच्या अखेरीस जॅग्वार लँड रोव्हर मॉडेलपैकी किमान एक इलेक्ट्रिक वाहन तयार करण्याची योजना आखत आहोत. 

Related Articles